मंगळवार, १० जुलै, २०१८

रेल्वेतील फेरीवाला शाळकरी मुलगा





रेल्वेतील फेरीवाला शाळकरी मुलगा



           नेहमीप्रमाणे मी पुण्याहून इंद्रायनीने घरी परतत होतो. खंडाळा स्टेशन गेल्यानंतर सावळ्या रंगाचा, मळकट पिवळा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातलेला एक फेरीवाला मुलगा भेदरलेल्या अवस्थेत हुंदके देत रडतांना दिसला. अधून मधून तो मागे पहात होता. मी  त्याला विचारले की तू का रडतोस? त्यावर तो मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाला "पोलिसाने माझे १०० रु घेतले", व पुन्हा रडायला लागला. मी त्याला म्हटले अरे मग रडतोस काय? नकळत माझा हात खिशाकडे गेला व मी त्याला खिशातून १०० रु काढून देऊ केले. पण सुरुवातीला त्याने घेतले नाही. माझ्यासोबतचे सहप्रवासी अवाक होऊन माझ्याकडे बघत होते व त्यांनीही त्याला पैसे देऊ केले. पण तो टॉयलेटच्या बाजूला कोपऱ्यात जाऊन बसला. पण त्याची नजर मात्र सारखी त्या पोलिसाकडे होती.
                मी मात्र अस्वस्थ होतो. मनोमन त्या पोलिसाबद्दल राग व्यक्त करत होतो. त्या मुलाने रबर विकून कमावलेले 100 रु ही त्याने हिसकावून घ्यावेत. त्याचा खूप रागही आला.
मला राहवलं नाही . मी पुन्हा त्या मुलाला बोलावून घेतले. तेव्हा त्याने सांगितले की तो पोलीस त्याच्याकडे ५००रु हप्ता मागत होता. व शाळेला सुट्ट्या असल्याने तो सुट्टीत आईला मदत व्हावी म्हणून हे काम करत आहे व आजचा त्याचा पहिलाच दिवस व त्याने तासभर रबर विकून कमावलेले १०० रु देखील त्या पोलिसाने घेतले.
५०० रु चा मालच होता त्यातलेही त्याने घेतले घरी बहीण आजारी, खायला काय नेऊ म्हणत पुन्हा रडायला लागला.
            माझ्या खिशात एक हजार रुपयेच होते. पण तरीही मी ५००रु खिशातून काढून त्याच्याकडच्या  वस्तू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे दिले. तो अवाकच झाला पण मग बाकीचे प्रवासीही 20-30 रु काढून त्याच्या वस्तू घेऊ लागले, तसे पाहिले तर मला व त्यांनाही त्या वस्तूंची गरजच नव्हती. पण त्या क्षणी मलाही इतर काही सुचले नाही. माझ्यातील शिक्षकाला त्या मुलाची व्यथा पहावली नाही.
          प्रश्न वस्तू घेण्याचा नव्हताच. पण प्रामाणिकपणे कुटुंबाच्या मदतीसाठी हे काम करणारा, कदाचित system बद्दल तिटकारा येऊन तो शाळकरी मुलगा पॉकेटमारी कडे वळला असता किंवा इतर काही चुकीचे वागला असता. सर्व वस्तू विकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
मी त्याला नाव विचारले तेव्हा त्याने सांगितले "कचमल लाखन प्रकाश."
मी  विचारले, "कुठला तू?"
तो म्हणाला,"आंध्रप्रदेशचा!"
मी विचारले,"इकडे कुठे राहतोस?"
तो म्हणाला, "ठाण्याला!"
मी विचारले,"शाळेत कितवीला आहेस?"
तो म्हणाला, "नववीत, तेलगू माध्यमात!"
             त्याला म्हटले परिस्थितीने खचून जाऊ नकोस. असे प्रसंग तर जीवनात येतच राहतील. रेल्वेत वस्तू विकण्यापेक्षा काही वेगळे काम करून शाळा शिक.   बाजूचे प्रवासी निशब्द होऊन माझ्याकडे पहातच राहिले. जवळच्यांना तर सर्वच मदत करतात. पण केवळ माणुसकी म्हणून त्याला मी केलेली मदत त्यांनाही त्याच्या वस्तू घेण्यावाचून रोखू शकली नाही. एवढा वेळ उभा असूनही तसूभरही न हळणाऱ्या प्रवाशांनी चक्क मला बसायला जागा तर दिलीच पण आदराने विचारपूस करू लागले. मग गप्पा रंगल्या.
त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य डोळ्यांमध्ये साठवून मी कल्याणला उतरलो व आसनगाव ट्रेनने घरी परतलो. त्या वस्तू आमच्या शाळेतील छोट्या आदिवासी मुलींना वाटल्या तेव्हा तो आनंद अधिकच द्विगुणित झाला. अजूनही त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या बदललेल्या छटा व त्याच्या डोळ्यांमधले कृतज्ञतेचे भाव मला खूप आनंद देऊन जातात.


शरद पांढरे
05जून 2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा