शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

सेमी- इंग्रजी "काल, आज व उद्या 

सेमी- इंग्रजी "काल, आज व उद्या                  

                                                                         -         शरद लक्ष्मण   पांढरे 
                        
                        शिक्षण प्रक्रियेत भाषेला अनन्य साधारण महत्व आहे कारण भाषेतून संस्कृती झिरपत असते. म्हणूनच प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. खरंतर शिक्षण ही देण्यापेक्षा घेण्याची कला आहे. 21 व्या शतकात वाटचाल करत असतांना मात्र अचानक पालकांचा रोख इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे सुरु झाला. मशरूम प्रमाणे या शाळांची संख्या वाढू लागली. 'येरे येरे पावसाची' जागा 'Rain rain, go to Spain' ने घेतली. मराठी माध्यमाच्या शाळांच्या गजबजलेल्या तुकड्या धडाधड बंद होऊ लागल्या अन सुरु झाली लढाई अस्तित्व टिकवण्याची....  दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केवळ काही पालकांनी प्रतिष्ठेपायी दाखल केलेल्या काही मुलांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली.
                    
एकीकडे इंग्रजीचे वाढते महत्व, तर दुसरीकडे भाषा व संस्कृती यांची लढाई ... या पार्श्वभूमीवर सेमी इंग्रजी हा उत्तम पर्याय म्हणून उभा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही bilingual medium of education याला महत्व दिलेले आहे. सेमी इंग्रजी मध्ये विज्ञान व गणित हे विषय फक्त इंग्रजीतून व इतर विषय मातृभाषेतून दिलेले असतात. १९६५ पासून केंद्रीय विद्यालये१९८६ पासून नवोदय विद्यालयातून सेमी इंग्रजी सुरु झाले. अर्थात त्यामध्ये हिंदी व इंग्रजी या भाषांचा प्रामुख्याने समावेश होता. १९८० च्या दशकात ८ वी पासून सेमी इंग्रजीला सुरुवात झाली२००४ पासून पाचवी पासून, तर  साधारणतः  २०१० पासून पहिलीपासून सेमी इंग्रजीला महाराष्ट्रात सुरुवात झाली.
                      मागच्या महिन्यातच या विषयावर एका शिक्षण परिषदेचे आयोजन माजी शिक्षण संचालक आदरणीय वसंत काळपांडे सरांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यामध्ये विविध तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
                     विद्यार्थ्यांमध्ये
 आत्मविश्वास  निर्माण करण्यासाठी, मुलांचे गणित व विज्ञानातील संबोध अधिक स्पष्ट व्हावेत, समाजपूर्वक वाचन, लेखन व आकलनासाठी, उच्च शिक्षणासाठी, मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, पालक व विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, इंग्रजी माध्यमाचे आकर्षण कमी व्हावे इ. साठी सेमी इंग्रजीची गरज आहे. सेमी इंग्रजीचा पर्याय जर पालकांपुढे नसता तर अल्प उत्पन्न गटातील एक मोठा वर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळला असता.
                       
पण केवळ तुकड्या वाचाव्यात म्हणून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करणे योग्य होणार नाही. मुलांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत होण्यासाठी सेमी इंग्रजी असायला हवे. पण आम्ही विद्यार्थ्यांना शाळेतून तेवढे exposure देतोय का? क्लासला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? मुलांना तेवढे उत्कृष्ट शिक्षक मिळतात का? गणित व इंग्रजीतील संबोध लहान वर्गांमध्ये मातृभाषेप्रमाणे स्पष्ट होतील का? मुलांचे इंग्रजीतील संभाषण कौशल्य तेवढे चांगले विकसित होईल कायांसारखे अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात.
                        
याचबरोबर कोणत्या इयत्तेपासून माध्यमाची सुरुवात व्हावी हा प्रश्न आहे. अनेक जाणकारांच्या मते पाहिलीपेक्षा पाचवीपासून सेमी इंग्रजीची सुरुवात करावी. जेणेकरून पहिल्या चार वर्गात त्यांचे मूलभूत संबोध मातृभाषेतून अधिक दृढ होतील.
                       
शिक्षण सेवक, अंशदायी पेन्शन योजना सारख्या योजनांमुळे शिक्षण क्षेत्राकडे गुणवंत विद्यार्थी करिअर ऑप्शन म्हणुन पाठ फिरवत असल्याने भविष्यात शिक्षकांची शैक्षणिक पार्श्वभूमी हाही मुद्दा प्रामुख्याने भेडसावणार आहे व तो चिंतेचा विषय ठरू शकेल.
                       
परंतु हे अपवाद वगळता पुढील बाबींचा अवलंब करून आपणांस काही ठोस भूमिका घ्याव्या लागतील. या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तका सोबतच मराठी माध्यमाची विज्ञान व गणिताची पुस्तके simultaneously वाचायला लावावीत. शिकवतांना शक्य तेवढ्या प्रमाणात multi-lingual approach फॉलो करावा. विज्ञान व गणित चे शब्दकोश वापरण्यास मुलांना प्रवृत्त करावे. ज्ञानरचनावादाचा व डिजिटल क्लासरूमचा वापर, शक्य त्या ठिकाणी communicative approach, नाटयीकरण, collaborative learning, क्षेत्रभेटी यांचा अवलंब करावा.
                         
विविध विषयांसोबत सांगड घालून या विषयांचे संबोध स्पष्ट करावेत. सदर वर्गांना दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे शिक्षक नेमावेत. गणित पेटी, विज्ञान कोपरा, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शने आयोजित करून प्रत्येक विद्यार्थ्याला सादरीकरण करण्याच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दोन्ही भाषेत द्यावीत. दहावीपर्यंत अध्यापनात इंग्रजीचा वापर क्रमशः व तारतम्याने वाढवत न्यावा. परिसरातील वनस्पती व वस्तूंना मराठीतील नावांसोबत त्यांचे scientific नाव दर्शविणारे फलक लावावेत. इ. १ ली पासूनच विद्यार्थ्यांची शाळेत इंग्रजी विषयाची व भाषेची तयारी अधिक करून घ्यावी. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा अधिक कौशल्यपूर्ण वापर होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गात वेळोवेळी उपचारात्मक अध्यापन अधिक प्रभावी व्हावे.
 
                              विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा व मातृभाषेचा  देखील स्पष्टीकरण करतांना सुरुवातीस करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रमाणभाषा व इंग्रजी बद्दलची भीती दूर होऊन ते शिकण्यास प्रवृत्त होतील. अभ्यासक्रम आराखड्यातही सदर बाबीचा उल्लेख केलेला आहे.
                         
पालकांची भूमिका देखील आत्ता बदलणे गरजेचे आहे. मुलांना केवळ शाळेत पाठवून दिले म्हणजे आपले काम संपले असे म्हणून चालणार नाही. शिक्षणास पोषक वातावरण घरात देखील निर्माण करावे. टेक्नॉलॉजीचा न्याय्य वापर, शिक्षकांबाबत आदरत्यांना पडलेले विविध प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, स्वअभ्यास करण्यास प्रेरणा देऊन त्यांना आरोग्यदायी सवयी लावाव्यात. अपेक्षांचे अनाठायी ओझे मुलांवर लादू नये. त्यांचे शिक्षण आनंददायी कसे होईल व मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.
                             
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पर्यायांसोबतच आव्हानही येतच असतात. परंतु शहरी तसेच ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांना शाळेतून अधिक प्रमाणात मार्गदर्शन व वाव मिळाल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळून सेमी इंग्रजी हा अधिक प्रभावी पर्याय होऊ शकेल.  अर्थात शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने motivation देणे अत्यावश्यक आहे.


     शरद लक्ष्मण पांढरे,
           ९२७०२५७९०२

1 टिप्पणी:

  1. आनंदाची बाब म्हणजे आदिवासी विकास विभागात इ 6वी पासून अनेक आश्रम
    शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु होत आहेत......

    उत्तर द्याहटवा